Ad will apear here
Next
मातीच्या आड गेलेले लढवय्ये हेच स्फूर्तीचे झरे
‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे प्रतिपादन


चिपळूण :
‘मातीच्या आड गेलेले लढवय्ये, हेच स्फूर्तीचे खरे झरे आहेत. लेखक त्यातील माती आणि वाळू बाजूला करतो आणि रत्न सादर करतो,’ अशा शब्दांत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी ऐतिहासिक कादंबरीलेखनामागची आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पानिपत’सह संभाजी, पांगिरा, झाडाझडती इत्यादी कादंबऱ्यांचा लेखनप्रवास चिपळुणात नुकत्याच झालेल्या राज्य प्रकाशक-लेखक संमेलनात त्यांनी उलगडून दाखवला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष तथा लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.

पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरजवळच्या नेर्ले या आजही प्राथमिक सुविधांपासून वंचित असलेल्या गावात माझा जन्म झाला. त्याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे मी मोठा लेखक होऊ शकलो. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी म्हणजे पिंजऱ्यातील पोपट आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी म्हणजे पंखांमध्ये ऊन, पाऊस, वारा सहज झेलणारे रानातले पक्षी असतात, हे वास्तव आहे. माझ्या गावाच्या परिसरातील विशाळगड, पन्हाळा हे ऐतिहासिक किल्ले, प्रचंड पडणारा पाऊस आणि चार महिने तुटणारा गावाचा संपर्क, गावातील लोककला, बंगालच्या निर्मितीचा इतिहास सांगणारा तमाशातील वग इत्यादी गोष्टींचा ठसा माझ्या लेखनावर उमटला.’

तुम्हाला लिहावेसे केव्हा वाटले, असा प्रश्न प्रा. जोशी यांनी विचारला तेव्हा पाटील म्हणाले, ‘मी पाचवीत असताना जादूच्या गोष्टी लिहिल्या. तेथूनच लेखनाची सुरुवात झाली. आठवीत असताना र. वा. दिघे यांची सराई ही कादंबरी, अण्णा भाऊ साठे यांची फकिरा, नाथमाधवांची वज्राघात अशा कादंबऱ्या योग्य वयात वाचायला मिळाल्या. त्यामुळे मलाही लिहावेसे वाटू लागले. वयाच्या बाविसाव्या वर्षी ‘पानिपत’बद्दलचे अगदी दोन-तीन पानांमध्ये लिहिलेले त्रोटक वर्णन मी एका पुस्तकात वाचले. त्यातील कथाबीज उमगले. ते आव्हान वाटल्यामुळे मी त्यावर लिहायचे, असे ठरविले; पण पानिपत ही कादंबरी लिहायला मला सहा वर्षे लागली. त्यासाठी मी आठ-दहा वेळा पानिपत, सोनपत, बागपत, कर्नाल या भागात १९८७ साली साडेतीन महिने राहून संशोधन केले. ती कादंबरी लिहून पूर्ण झाल्यानंतर प्रकाशकांकडे गेलो; पण अकरा जणांनी ही कादंबरी नाकारली. ‘विचारवांती’ या एका नियतकालिकात मी एक लेख लिहिला होता. तो आनंद यादव यांनी वाचला होता. वास्तविक ते नंतर लिहिलेल्या ‘पांगिरा’ कादंबरीतील अखेरचे प्रकरण होते. ते वाचल्यानंतर माझ्या लेखनात काही आहे, असे वाटल्याने यादव यांनी माजगावकरांकडे माझी शिफारस केली. त्यानंतर ही कादंबरी प्रकाशित झाली.’



कादंबरीबद्दलच्या प्रतिक्रियांविषयी विचारता पाटील म्हणाले, ‘पुण्यात फौजदारी वकिली करणारे अॅड. गं. नि. जोगळेकर यांनी ही कादंबरी ६२ वेळा वाचली. कोणतीही अडचण आली किंवा दुःख झाले की ती कांदबरी वाचून प्रेरणा घेतो, असा अनुभव त्यांनी सांगितला. साताऱ्यातील एका विद्यार्थिनीने पत्र लिहून दिलेली प्रतिक्रिया मला लेखक म्हणून झालेला गर्व खाली आणणारी ठरली. भाऊसाहेबांच्या डोक्यावरील केसांमधून त्यांची पत्नी पार्वती हात फिरवत आहे, असा प्रसंग आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या या प्रसंगात पेशव्यांच्या डोक्यावर केस होते का, असा सवाल त्या मुलीने केला होता.’

‘पांगिरा’ कादंबरीच्या कथाबीजाविषयी ते म्हणाले, ‘फलटण भागात मी प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असताना फलटण, माण, खटाव अशा दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. लोकशाहीचे बेंगळूर रूप मला तेथे पाहायला मिळाले. निवडणुकीच्या काळात होणारे ग्रामीण भागातील गटातटांचे राजकारण मी पाहिले. मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळविण्यासाठी वाघाशी झुंज देणाऱ्या आणि वाघाचे कातडे विकणाऱ्या ग्रामस्थाचा अनुभव ऐकल्यानंतर ‘झाडाझडती’ कादंबरीचा विषय सुचला. रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून साडेतीन वर्षे काम करताना रायगडसारखे किल्ले, घाट, दऱ्याखोऱ्यातून फिरताना मला इतिहासानेच ओढून घेतले. असे ऐतिहासिक विषय मी लिहीत असल्याने काही जण मला विचारतात, की मेलेली मढी तुम्ही का उकरून काढता? पण जे असे लढवय्ये मातीच्या आड गेले, तेच तर स्फूर्तीचे झरे आहेत. लेखक त्यातील वाळू आणि माती बाजूला करतो आणि रत्न बाहेर काढत असतो.’

‘सोहराब मोदी, भालजी पेंढारकर यांच्या काळातील ऐतिहासिक चित्रपट दर्जेदार होते. आताच्या ऐतिहासिक चित्रपटांत विकृती दिसते. काशीबाई, मल्हारराव होळकर, बाजीराव अशा व्यक्तिमत्त्वांनी आपल्या बळावर इतरांना नाचवले होते. ही ऐतिहासिक पात्रे ‘पानिपत’ चित्रपटात नाचगाण्यात रमल्याचे दाखवले जाते. या विकृतीचाच मोठा धोका आहे,’ अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.

समकालीन लेखकांमध्ये चारुता सागर, राजन खान, आनंद सामंत यांचे लेखन आवडत असल्याचे पाटील यांनी सांगितले. ‘नव्याने काही लिहायचे असेल, तर मनाला जखम झाली पाहिजे. दुसऱ्यांच्या भावनांचा अनुभव घेता आला पाहिजे,’ असे सांगून श्री. पाटील म्हणाले, ‘मध्यंतरीच्या काळात दलितांची अनेक आत्मकथने प्रसिद्ध झाली; पण त्या लेखकांची इतर निर्मिती चांगली झाली नाही. कारण स्वतःचे अनुभव मांडले, तरी इतरांचा अनुभव त्यांना घेता आला नाही. असे अनुभव येण्यासाठी लेखकांनी स्वतःला मोकाट सोडावे, भरपूर फिरावे. प्रेमचंद, शरच्चंद्र चटर्जी अशा नामवंत लेखकांनी भरपूर प्रवास केला. देश जाणून घेतला. लोकांना जाणून घेतले. म्हणून त्यांच्या लेखनकृती सशक्त झाल्या.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZATCH
Similar Posts
डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी : अनिल मेहता चिपळूण : ‘नव्या माध्यमांच्या वापरातून आपले मन सुसंस्कृत करणे ही प्रत्येकाची गरज आहे. सुसंस्कृत मने तयार करण्यात पुस्तकांचा आणि पर्यायाने प्रकाशकांचा वाटा मोलाचा असतो. त्यामुळे नव्या युगातील डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी चिपळुणात व्यक्त केले
संतांनी केलेल्या बंडखोरीकडे आजच्या साहित्यिकांनी पाहावे : डॉ. अरुणा ढेरे रत्नागिरी : ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सर्वांत मोठी बंडखोरी कोणी केली असेल, तर ती संतांनी आणि तीसुद्धा कोणत्याही प्रकारचा झेंडा न नाचवता! गीता शूद्रांपर्यंत पोहोचवणं ही बंडखोरीच होती. या संतकालीन बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पाहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिका डॉ
आधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर केल्यास वाचनसंस्कृतीला धोका नाही चिपळूण : ‘आधुनिक प्रसारमाध्यमांचा योग्य तो उपयोग करून घेतला, तर प्रकाशन व्यवसाय आणि मराठी वाचन संस्कृतीला कोणताही धोका नाही,’ असा सूर चिपळूणमध्ये भरलेल्या दुसऱ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनातील परिसंवादात निघाला. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा
‘मराठीच्या समृद्धीसाठी व्हावीत छोटी साहित्य संमेलने’ रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी छोट्या-छोट्या साहित्य संमेलनांची भूमिका स्पष्ट केली. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language